Wednesday, January 21, 2009

'आई'

"बबडे,
मला अजूनही आठवते गं तुझी ती पहिली हाक
'आई.........!!!'
कित्ती मोहरले होते गं मी तेव्हा
नखशिखांत पान्हा फुटावा तशी
तुला हाताच्या झोळीत घेऊन
किती वेळ नुसती रडत बसले होते मी
तुला कुठनं आठवेल हे..
वर्षाचीसुद्धा नव्हतीस गं तू
तुझ्या येण्याने जो मिळाला नाही,
तो आनंद तुझ्या त्या हाकेने मिळालेला मला.
आता तू मोठी झालीस, कळू सवरू लागलीस.पण.......
पण एक कर पोरी,
इतर मुलींसारखी आता तूही मला 'आया' नको गं म्हणूस.
मला, मेल्या वांझोटीला, जगण्याचं एकतरी कारण राहू दे गं
बोलशील ना गं मला 'आई'....
बबडे, बोलशील ना ?"